जळगाव (प्रतिनिधी) ९० एमएल दारुसाठी ५०० रुपयांची नोट दिली. मात्र सुट्टे नसल्याने व्यवस्थापकाने सांगत दारु देण्यास नकार दिल्याने व्यवस्थापकासह हॉटेल चालक व त्यांच्या भावाला दोन जणांनी मारहाण केली. तर या हॉटेलमधील तिघांनी विनाकारण मारहाण केल्याची दुसरी तक्रार तरुणाने दिली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून एकूण पाच जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील खोटे नगर थांब्याजवळील एका हॉटेलमध्ये रात्री सुखदेव हुकुमचंद चौधरी (वय ३१, रा. खोटेनगर) त्यांच्यासोबत असलेला एक जण असे दोघे जण गेले. त्यांनी ९० एमएल दारु घेण्यासाठी ५०० रुपयांची नोट दिली. परंतू सुट्टे नसल्याचे कारण देत व्यवस्थापक दिनेश लाकरा यांनी चौधरी यांना दारु देण्यास नकार दिला. त्यावरून दोघांनी व्यवस्थापकासोबत वाद घालीत त्यांना मारहाण केली. या ठिकाणी हॉटेल चालक गुलाब भाऊलाल पाटील (वय ४३, रा. समर्थ कॉलनी) व त्यांचे मोठे भाऊ ज्ञानेश्वर पाटील हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही एका जणाने पकडून ठेवत सुखदेव चौधरी याने मोगरीने मारहाण केली. यामध्ये दोघांना दुखापत झाली. या प्रकरणी गुलाब पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल चालकांनी विनाकारण मारहाण केल्याची दुसरी तक्रार सुखदेव हुकुमचंद चौधरी (वय ३१, रा. खोटेनगर) यांनी दिली असून त्यात म्हटले आहे की, दिनेश लाकरा, ज्ञानेश्वर भावलाल पाटील, गुलाब भावलाल पाटील यांनी विनाकारण मारहाण केली. त्यात डोळ्याजवळ दुखापत झाली. यावरून दिनेश लाकरा, ज्ञानेश्वर पाटील, गुलाब पाटील यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहेत.