पुणे (वृत्तसंस्था) राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर अनेक लोक दुकाने सुरु करायला लागतील. तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सरकारला आम्हाला अटक करायची असेल तर करा. पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. पण विकेंड लॉकडाऊन सांगत सातही दिवस लॉकडाऊनची स्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप सरकारवर करण्यात येतोय. सरकारच्या या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. राज्यातील नागरिक लॉकडाऊनला विरोध करण्याच्या तयारीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. लोकांनी विरोध करण्यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर अनेक लोक दुकाने सुरु करायला लागतील. तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सरकारला आम्हाला अटक करायची असेल तर करा. पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिलाय.
महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. गेल्या वर्षी जे जम्बो कोविड सेंटर सुरुवातीला सरकार चालवत होते. ते नंतर खाबूगिरीसाठी नातेवाईक आणि एनडीओंना चालवायला दिले, अशी घणाघाती टीकाही आंबेडकरांनी राज्य सरकावर केलीय. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक भरडले जात आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा राजकीय दृष्टीनेच विचार करावा लागेल, असं आंबेडकर यांनी म्हटलंय.