मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारने राज्यात लोकशाहीला कुलूपबंद केलं आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे. या अधिवेशनात भाजपच्या आमदारांची संख्या कमी व्हावी यासाठी सत्ताधाऱ्यांनी आमच्या १२ आमदारांना वर्षभर निलंबित केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. राज्यात बरेच मुद्दे सध्या तापलेले आहेत. त्यामुळे या अधिवेशनात अनेक मुद्दे विरोधकांच्या भात्यात असणार आहेत. अधिवेशनापूर्वी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं झाली. अशातच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, “उद्यापासून विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या परंपरेप्रमाणे जितकी लहानात लहान अधिवेशनं घेता येतील, जेवढ्या जास्तीत जास्त चर्चा टाळता येतील आणि जेवढी लोकशाही कुलुपबंद करता येईल, तेवढी करण्याचा प्रयत्न या छोट्याशा अधिवेशनातून केला जात आहे.”
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, “१२ आमदार बाहेर ठेवून अध्यक्ष पदाची निवडणुक घ्यायची? याचा अर्थ हे सरकार किती असुरक्षित आहे हे दिसते. गुप्त मतदानाने निवडणूक घेण्याची पद्धत असताना हे नियमबाह्य मतदान करण्याची तयारी करत आहे. नियम समितीचे नियम डावलून प्रस्ताव सादर करणार आहेत. लोकशाही कुलूप बंद करता येईल असं छोटे अधिवेशन सत्ताधारी घेत आहेत. राज्यात अधिवेशन घ्यायची मानसिकता नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. फक्त ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे.”