मालेगाव (वृत्तसंस्था) मालेगाव महानगरपालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) महापौरांसह तब्बल २७ नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वच्या सर्व काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने काँग्रेस पक्षासाठी हा एक मोठा झटका आहे.
राज्यात एकीकडे तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे. पण असे असले तरीही या तीनही पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे सातत्याने दिसून येत आहे. कारण काँग्रेसचे मालेगाव महापालिकेतील २७ नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मात्र, एकत्र सत्तेत असताना देखील राष्ट्रवादीने अशा प्रकारे नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिल्याने काँग्रेसमध्ये मात्र आता नाराजी दिसून येत आहे.