मुंबई (वृत्तसंस्था) १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या कारवाईच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर ईडीनं अनिल देशमुखांवर आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि तपासात बाहेर आलेल्या गोष्टी यावरून ४ सवाल उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरून सचिन सावंत यांनी ईडीला हे प्रश्न केले आहेत.
गेले सात वर्षे मोदी सरकार अस्तित्वात आल्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्यांचा छळ करण्यासाठी व विरोधी पक्षाच्या सरकारांना बदनाम करण्यासाठी केला जात आहे. अनिल देशमुख यांची ईडीमार्फत सुरू असलेली चौकशी हा मोदी सरकारच्या राजकीय दबावतंत्राचा असून, या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बदनाम व अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे’, अशी टीका सावंत यांनी केली.
ईडीने उत्तरे द्यावीत असे म्हणत सचिन सावंतांचे ४ सवाल
१. अजूनही ₹ ३०० कोटींच्या मीडियातील वावड्यांची पुष्टी करता का? कारण आता आपल्या म्हणण्याप्रमाणे ही जमीन २००५ मध्ये खरेदी केली गेली आणि ₹ २.६७ कोटी किंमतीची आहे?
२. फ्लॅटची किंमत २००४ मध्ये दिली गेली तर तो या प्रकरणात कसा जोडला जाऊ शकतो?
३. तुम्ही जाहीर केले की डान्स बारच्या मालकांनी वाझे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना ₹ ४.७० कोटी दिले. ते बार मालक अद्याप गजाआड का नाहीत?
४. तथाकथित ₹ १०० कोटींच्या मागणीची माहिती असूनही कोणतीही कारवाई न करणाऱ्या परमबीर सिंह यांची चौकशी का केली जात नाही?