मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधला आहे.
समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केलाय. एका वृत्तसंस्थेनुसार, समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्तराँचा परवाना आहे. नवी मुंबईमधील वाशी येथे हा बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहेत. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच हा परवाना रिन्यू करण्यात आला असून सध्या तो ३१ मार्च २०२२ पर्यंत पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आलीय.
दरम्यान, गुरुवारीच मलिक यांनी वानखेडेंच्या शाळा दाखल्यावर ते ‘मुस्लीम’ असल्याची नोंद असल्याचा दावा केलाय. वानखेडे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरी मिळविल्याच्या आरोपाचं समर्थन करण्यासाठी मलिक यांनी वानखेडे यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर मुस्लीम अशी नोंद असल्याची माहिती दिली. वानखेडे यांनी मुंबई पालिकेच्या दस्तऐवजांमध्ये खाडाखोड केल्याचा आरोपही त्यांनी केला.