मुंबई (वृत्तसंस्था) संजय राऊत यांना सत्तेचा माज आला असून त्यांनी अपक्ष आमदारांची बदनामी करण्याचा गाढवपणा केल्याची टीका भाजपा नेते अनिल बोंडे यांनी केली आहे. राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बोंडे नागपूरात दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला वैतागली आहे. एवढचं नाही तर महाविकास आघाडीतील आणि अपक्ष आमदारही वैतागले” असल्याचा आरोप भाजपा नेते अनिल बोंडे यांनी केला आहे. संजय राऊत यांच्याकडेही यंत्रणा आहे. संजय राऊत बदलेच्या भावनेने प्रत्येक वेळेस चूका करतात. राऊत द्वेषाने पेटलेले आहेत. सत्ता लोकांसाठी असते. लोकांच्या भल्यासाठी असते. मात्र, संजय राऊत यांना सत्तेचा माज आला असल्याची टीका बोंडे यांनी केली आहे. संजय राऊत आणि शिवसेनेने अपक्ष आमदारांचाही अपमान केला आहे. म्हणजे अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले, किंमत घेतली असा आरोप करून बदनामी करण्याचा गाढवपणा संजय राऊत यांनी केला असल्याचेही बोंडे म्हणाले.
महाविकास आघाडीतल्या आमदारांकडून त्यांचे मंत्री कमिशन घेतात तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? असा सवालही बोंडे यांनी केला. आघाडीतील आमदारांनाच त्यांचे मंत्री, मुख्यमंत्री भेटत नाहीत तर जनतेला केव्हा भेटणार. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे. आणि यांच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे होत असल्याचा आरोपही बोंडे यांनी केला आहे. सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळाचीच आठवण येत आहे. त्यामुळे जनतेची देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावेत अशी इच्छा असल्याचा दावा बोंडे यांनी केला आहे.