मुंबई(वृत्तसंस्था) :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटकेची कारवाई केल्यामुळे तब्बल १०२ दिवस तुरुंगात असणाऱ्या राऊत यांना मंगळवारी पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्याने त्यांची सुटका झाली. राऊत यांच्या सुटकेनंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण असतानाच उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी शिवसेनेतील फुटीनंतर भक्कमपणे पक्षाची बाजू मांडल्याबद्दल संजय राऊत यांनी सुषमा अंधारे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.
सुषमा अंधारे यांनी खासदार राऊत यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना या भेटीचा तपशील दिला. ‘आजच्या भेटीवेळी मी राऊत साहेबांना म्हटलं, सर आम्ही खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या परीने खिंड लढवली. फार मोठे काही केलं नाही. त्यावर राऊत साहेब उत्तरले, ही खिंड निकराने लढलात, त्यामुळे ती पावनखिंड झाली,’ असं राऊत यांनी म्हटल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलं.