धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे दि.२७ जुलै, बुधवारी संतश्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. प्रमुख व्याख्याते म्हणून शाळेतील आदर्श शिक्षक पी.डी.पाटील होते. मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
व्याख्याते, आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांनी आद्य-संत शिरोमणी सावता महाराज यांचा जीवन पट उलगडताना मनोगतात सांगितले की, महाराष्ट्राच्या भूमीत १२ व्या शतकातील आद्य संत शिरोमणी संत सावता महाराज यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरेतील मालिका शेकडो वर्षापासून सुरू आहे, संत परंपरेत त्यांचे एक अढळ स्थान आहे. त्यांचा जन्म ई.स. १२५० तर, मृत्यू १२९५ अरण या गावी झाला. त्यांना केवळ ४५ वर्षाचे आयुष्य लाभले. सावतोबांनी भक्ती व मुक्तीचे कार्य उभारून सर्वांना कर्म, कर्तव्य व आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला आहे. पंढरपूर हे जरी महातीर्थ असले तरी ज्या ठिकाणी संत महात्म्यांचा जन्म झाला ती ठिकाणे महाक्षेत्रापेक्षा तसूभरही कमी नाहीत. सावतोबांचे अरण, तुकाबारायांचे देहू, ज्ञानेश्वरांचे नेवासा क्षेत्र असो त्या – त्या क्षेत्राला जनसामान्याच्या दृष्टीने महातीर्थ इतकेच महत्त्व व महात्मे प्राप्त झाले आहे.
आजपर्यंत तीर्थक्षेत्राच्या वर्गात अरण गावाला ‘अ’ दर्जा मिळणे अपेक्षित असताना देखील अद्यापही राज्य सरकारने “उपेक्षित” ठेवून जाहीर केलेले नाही. सध्याचे शासनाने अरण गावाला अ वर्ग जाहीर करावा. सावता महाराज पंढरपूर ला कधीही गेले नाहीत. सावतोबांचे अभंग, दोहे, भारुड रचना आजही श्रेष्ठ आहेत. ते सहज सांगतात “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी”.. याच अभंगाच्या माध्यमातुन त्यांनी समाजाला सदैव आपल्या कर्मातच देव आहे असे पटवून दिले आहे. आपण विद्यार्थ्यांनी देखील आपल्या पुस्तकांमध्ये, माणसांमध्ये देव शोधावा व उंच भरारी घ्यावी आणि आपल्या परिवाराची, गावाची, देशाची प्रगती करावी. सावता महाराजांच्या आदर्शानुसार अंधश्रद्धा, कर्मकांड, होमहवन, यज्ञ यापासून दूर रहावे. मुळातच वारकरी संप्रदायात पंथात अश्या पोकळ व भ्याकड कथेला कुठंही स्थान दिलेले नाही. संत परंपरेत आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. असेही शेवटी व्याख्याते श्री. पाटील सर यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी महाराष्ट्रातील संतांचे विचार आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. सातशे वर्षांपूर्वीचे विचार आज देखील आपल्यासाठी ऊर्जा देतात. तद्नंतर मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते पुण्यतिथीचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात निम, करंज व अशोक वृक्षांचा रोपांची लागवड करून खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एच डी माळी यांनी तर, आभार एम.जे. महाजन मॅम यांनी मानले. याप्रसंगी शाळेच्या जेष्ठ शिक्षिका पी आर सोनवणे, एम के कापडणे, सी एम भोळे, जे एस महाजन, एस व्ही आढावे, व्ही टी माळी, व्ही पी वऱ्हाडे, एम जे महाजन, एम बी मोरे, अशोक पाटील, जीवन भोई यासह असंख्य विद्यार्थी बंधू-भगिनी उपस्थित होते.