मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गायकवाड यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २० दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी १० वाजता त्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडिल होते.
काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून एकनाथ गायकवाड यांची ओळख होती. त्यांनी मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. एकनाथ गायकवाड यांनी शिवसेना नेते व लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळं काँग्रेसपक्षाला मोठा धक्का बसला आहे.