नागपूर (वृत्तसंस्था) राज्याची उपराजधानी नागपुरात हत्याच्या घटनां सुरूच आहे. कपिलनगरातील आवळेनगर येथे गुंडाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना कपिलनगरमधील आवळेनगर येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. उपराजधानीत हत्येचे सत्र सुरू असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.
शैलेश बालाजी देशभ्रत्तार (३४, रा. आवळेनगर) असे मृतकाचे नाव आहे. कपिलनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी राकेश मोतीलाल पटेल (वय ३२, रा. मानवनगर) याला अटक केली. शैलेशविरुद्ध हत्या, मारहाणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो परिसरातील नागरिकांना नेहमी त्रास द्यायचा. राकेशसोबत ओळख असल्याने गुरुवारी दुपारी शैलेश व राकेशने आवळेनगरमध्ये दारू प्यायली. याचदरम्यान शैलेशने राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली. शैलश नें राकेशला ठार मारण्याची धमकी देऊ लागला. शैलेश ठार मारेल, अशी भीती राकेशला वाटली. दरम्यान, अति मद्यसेवनाने शैलेश मोकळ्या जागेत झोपला. राकेशने दगडाने शैलशचे डोके ठेचून त्याचा खून केला व पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून राकेशला अटक करण्यांत आलीं.
कपिलनगरमध्ये गुन्हेगार सक्रिय झाले असून ते नागरिकांना त्रास देत आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यास पोलिस काहीच कारवाई करीत नाहीत. त्यामुळेच तीन दिवसांपूर्वी तरुणीची छेड काढल्याने तडीपार गुंड गोलू राजपूत याची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळेच कपिलनगरमध्ये गुन्हेगारांचे चांगलेच फावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.