पाचोरा (प्रतिनिधी) शाळेतील पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकून विद्यार्थ्यांसोबत घातपात करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दि. ३१ रोजी पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील भाऊसाहेब बाजीराव ओंकार पाटील माध्यमिक विद्यालयात घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाण्यातून दुर्गंधी आल्यानंतर समोर आली घटना !
पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे भाऊसाहेब बाजीराव ओंकार पाटील माध्यमिक विद्यालयाच्या वस्तीगृहात ३६ विद्यार्थी वास्तव्यास आहे. याठिकाणी प्रशांत बाबासाहेब गरुड हे वॉचमन म्हणून तर दिलीप आनंदा सपकाळे हे शिपाई म्हणून नोकरी करतात. दि. ३१ मार्च रोजी दुपारी प्रशांत गरुड यांनी शाळेचे मुख्याध्यापक अतुल ठोके यांना फोन करुन शाळेतील पाण्याच्या टाकीमधील पाण्याचा विषारी औषधाचा वास येत असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी तात्काळ शाळेत धाव घेत पाहणी केली. त्यांनी पाण्याचा वास घेतला असता त्याचा विषारी औषधाचा वास येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी विद्यार्थ्यांना विषबाधा होवू नये म्हणून लागलीच पाण्याची टाकी रिकामी केली.
टाकीजवळ आढळली विषारी औषधाची बाटली !
शाळेत पाण्याची टाकी ठेवलेल्या ठिकाणी शाळेच्या कर्मचाऱ्यांची पाहणी केली असता, त्यांना पांढऱ्या रंगाची आस्ट्रा कंपनीची विषारी औषधाची बाटली मिळून आली. दरम्यान, कोणीतरी अज्ञात माथेफिरुने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आणण्यासाठी हा खोडसरपणा केल्याचे लक्षात येताच मुख्याध्यापक अतुल ठोके यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात माथेफिरुविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.