मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती एकनाथ शिंदेनी केली. मी आतापर्यंत पक्षाविरोधी कोणतंही पाऊल उचललं नाही, त्यामुळे मला गटनेते पदावरून का काढण्यात आलं असा सवालही शिंदे यांनी केला आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर कथितप्रकारे बंड केलं आहे. ते सध्या गुजरातमधील सुरत येथील एका हॉटेलमध्ये आहेत. त्यांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर काही वेळापूर्वी सुरतमध्ये पोहोचले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून जवळपास ४० मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली आहे.
दरम्यान, नार्वेकर यांच्या फोनवरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात देखील संवाद झाल्याची माहिती समजत आहे. याबाबतचं वृत्त एका वृत्तसंस्थेने दिलं आहे. मी आतापर्यंत पक्षाविरोधी कोणतंही पाऊल उचललं नाही, त्यामुळे मला गटनेते पदावरून का काढण्यात आलं असा सवाल एकनाथ शिंदे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारल्याचं देखील समजत आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील नाराजी व्यक्ती केल्याची माहिती समजत आहे. संजय राऊत प्रत्यक्षात एक आणि माध्यमांत दुसरं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिंदे उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. यात संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली. शिंदेंचा गैरसमज झाला असे राऊत एकीकडे म्हणतात तर दुसरीकडे शिंदेंनी आमदारांचे अपहरण केले असे म्हणतात अशी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मी शिवसेनेविरोधात बोललो नाही, स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा केली नाही. पक्षांतर केले नाही ना भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही कागदावर सही केली नाही मग मला गटनेते पदावरुन का काढले? असा सवालही शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.
मला मंत्रीपदाची लालसा नाही. पण भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी मागणी करीत पुढे काय करायचे ते लवकरच अधिकृतपणे कळवणार आहे असे ठाकरेंना शिंदे म्हणाले.