मुंबई (वृत्तसंस्था) राज्य मंत्रिमंडळाची विस्ताराला मुहूर्त लागला आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यकररिणीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर उद्या एकाच टप्पात ३० जणांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन अनेक दिवस उलटले तरीही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. हे दोघंच निर्णय घेतात, दोघांचंच मंत्रिमंडळ आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. मात्र आता एकनाथ शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ लवकरात लवकर घोषित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात ३० मंत्र्यांना शपथ दिली जाईल, असंही सांगण्यात येत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ४ आमदारांमागे एक मंत्रिपद असे १३ मंत्रिपदे देण्यात येणार आहे. शिंदेंच्या गटात सामील झालेल्या ५ जणांकडे आधीच कॅबिनेट मंत्रिपद होते, तर अब्दुल सत्तार आणि शंभुराज देसाईंकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. शिंदे गटाला मिळणाऱ्या १३ मंत्रिपदामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद देखील आहेत.
भाजपचे जवळपास 22 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, सुध्रीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, यांच्यासह राम शिंदेंसह राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटातील संदीपान भुमरे, उदय सामंत, दादा भूसे, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार यांचा समावेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
















