मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांची मोठ्या फरकानं निवड झाली. यानिमित्ताने शिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली आहे. यामुळं उद्याच्या बहुमत चाचणीसाठी देखील शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारनं आज विधिमंडळ अधिवेशनात पहिल्या दिवशी पहिली लढाई जिंकली आहे. आज अधिवेशनात कामकाजाच्या शेवटी शोकप्रस्ताव मांडण्यात आलं. नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. आजच्या दिवसाचं कामकाज संपलं आहे. आता उद्या सकाळी 11 वाजता विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून सरकारची मुख्य परीक्षा असणार आहे.
दिग्गज नेत्यांची जोरदार टोलेबाजी
राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करताना अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी जोरदार टोलेबाजी केली. अनेक कट्टर काम करणारे मान्यवर थोडेसे नाराज आहेत. देवेंद्र फडणवीस टीव्हीवर बोलत होते आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितलं तेव्हा ‘पिन ड्रॉप सायलन्स’ झाला. कितीतरी भाजपाचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले. गिरीश महाजन यांचं तर अजूनही रडणं बंद होईना. त्यांना फेटा बांधायला दिला तर त्यांनी फेटा सोडून डोळ्याला आलेलं पाणी पुसण्यासाठी फेट्याचा वापर करत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचं फारच वाईट वाटलं,” असं म्हणत अजित पवारांनी गिरीश महाजन यांना कोपरखळी लगावली.
तर जयंत पाटील यांनी आमचे जावई असल्याने आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी आशा आहे. नाही तर संध्याकाळी आमच्या घरी मुलीला काय केलं ते कळवू. मग संध्याकाळी आपला समाचार घेण्याची विनंती करु, असं म्हटल्यानंतर हशा पिकला होता. तत्पूर्वी भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव आपलं नाव आणि क्रमांक सांगण्यासाठी उभ्या राहिल्या, तेव्हा विरोधी आमदारांनी ‘ईडी ईडी’ म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यामिनी जाधव यांनी शिवसेना पक्षाच्या विरोधात भूमिका घेत बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला गाठली होती. त्यामुळे यामिनी जाधव यांच्यावर ठाकरेंच्या विश्वासातील सेना आमदारांचा रोष आहे. याच रोषाला यामिनी जाधव यांना सामोरे जावे लागले. यानंतर मी जावई असल्याचं सांगत अजित पवार, जयंत पाटील यांनी काळजी घेण्यास सांगितलं. पण त्यांनीही जावयाची काळजी घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे योग्य सहकार्य मिळेल यात शंका नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले. गेल्या काही दिवसात अनेक धक्के, भूकंप आले. त्यातील एक धक्का मलाही मिळाला. माझी निवड झाली असं सांगत नार्वेकर यांनी पक्षाचे आभार मानले.
शिवसेनेकडून तक्रार दाखल, तर शिंदे गटाकडून 16 आमदारांविरोधात पत्र
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे. याबद्दल शिवसेनेनं तातडीने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. सेनेची तक्रार ही सभागृहाच्या पटलावर घेतली आहे. लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक झाली. पण, विधानसभेच्या नियमानुसार, पक्षाने जो व्हीप बजावला होता, त्या व्हीपच्या विरोधात 39 आमदारांनी मतदान केलं आहे. आम्ही सर्व आमदारांच्या नावानिशी तक्रार अध्यक्षांकडे केली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आधीच याचिका दाखल केली आहे. आधीच 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली.