मुंबई (वृत्तसंस्था) ‘दादरा नगरहवेलीची जागा अपक्ष उमेदवार कलाबेन डेलकर यांनी जिंकलीय. पण शिवसेना सगळीकडं डंका पिटतेय. महाराष्ट्राबाहेर झेंडा लावल्याचं सांगतेय. मी माहिती घेतली असता विजयी उमेदवाराची निशाणी ‘बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज’ अशी आहे. पण दुसऱ्याच्या मुलाचं बारसं करण्याची सवय शिवसेनेला आहे, असे म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बऱ्याच दिवसाने मी तुमच्यासमोर आलो आहे. काहींचे फटाके ऐकत होतो. संजय राऊतांचे अग्रलेख दोन दिवसांपासून वाचत होतो. देशात पोटनिवडणुका झाल्या. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला आम्ही जिंकलो. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो असा डंका पिटत आहेत सर्वत्र. मी मुद्दामहून त्या विजयी उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज ही त्या उमेदवाराची निशाणी आहे. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच, असा सणसणीत टोला राणेंनी लगावला.
कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. संजय राऊतांना लिखाण करताना त्यांना भान राहत नाही. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे. तुम्ही एकने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसतील, असा हल्लाही त्यांनी चढवला.
भाजपवर टीकेचा भडीमार सुरू आहे. आता ५६ आमदार आहात. ते मोदींमुळेच निवडून आला आहात. नाही तर ८च्यावर गेला नसता. राजकीय निरीक्षकही त्यावेळी हाच आकडा सांगत होते. मोदींची मेहरबानी म्हणून 56चा आकडा आला. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असं सांगतानाच मुख्यमंत्री काय बोलतात ते कळत नाही. पत्रकारांना कसं कळतं? मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी म्हणून सांगता. पण फटकेबाजी नेमकी काय? मीडियाने आतापर्यंत सांभाळलं, असंही त्यांनी सांगितलं.