मुंबई (वृत्तसंस्था) पंजाबमधल्या राजकीय नाट्यावर आज देशभरात चर्चा सुरू आहे. यावर आता शिवसेनेनं अमित शाह आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या भेटीवर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेसचे जे व्हायचे किंवा करायचे ते त्यांचे नेतृत्व करील, पण गिधाडे फडफडावीत तसे काँग्रेसच्या अस्तित्वावर घिरट्या मारण्याचे उद्योग सुरू आहेत, असं म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेनं निशाणा साधला आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात ?
‘काँग्रेसचे जे व्हायचे किंवा करायचे ते त्यांचे नेतृत्व करील, पण गिधाडे फडफडावीत तसे काँग्रेसच्या अस्तित्वावर घिरट्या मारण्याचे उद्योग सुरू आहेत. पंजाबात सध्या जे घडवले जात आहे ते प. बंगाल, महाराष्ट्राच्या बाबतीतही घडविण्याचा प्रयत्न होतच असतो. प. बंगालात भाजप विरोधी पक्षात आहे. तेथेही अनेकदा लोकप्रिय सरकारला डावलून केंद्राचे लोक विरोधी पक्षाला चर्चेसाठी बोलावतात. विरोधी पक्षाच्या सूचनेनुसार प. बंगालसंदर्भात निर्णय घेतले जातात. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे लोक ऊठसूट दिल्लीस जातात व राज्याच्या बाबतीत केंद्राचे कान भरतात. जणू विरोधकांचे नित्यनेमाने दिल्लीत डोहाळे जेवणच असते व त्यासाठी सर्व लोक दिल्लीस जात असतात,’
‘काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे पदे भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱ्या म्हातार महामंडळाने ‘जी-२३’ नावाचा गट स्थापन केला व ते काँग्रेसची अंतर्गत भांडणे चव्हाट्यावर आणत आहेत. राहुल गांधींनी देशातील ‘जनतेचा आवाज’ बनू नये, असाही या म्हातार महामंडळाचा आग्रह असतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत राहुल यांची तोफ केंद्र सरकारच्या विरोधात सतत धडधडतच असते. मीडियावरूनही मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. बहुधा हेच काँग्रेसमधील या ‘म्हाताऱ्या अर्कां’ ना खटकत आहे’,
‘पंजाब हे सीमेवरील राज्य आहे. पंजाबातील अशांतता व असंतोषामुळे देशाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. हजारो लोकांचे रक्त त्यात सांडले. भिंद्रनवाले प्रकरण हा काळा अध्याय होता. ते सर्व पर्व संपवून पंजाबने नवा अध्याय सुरू केला. पंजाबात पुन्हा राजकीय अशांतता निर्माण झाली तर अतिरेकी प्रवृत्ती डोके वर काढतील, याचे भान केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठेवण्यातच देशाचे हित आहे,’
‘देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, पण अमरिंदर आता जी चिंता व्यक्त करीत आहेत त्याप्रमाणे पंजाबच्या सीमेवर काय घडले आहे? लडाख, कश्मीर सीमेप्रमाणे त्या सीमेवरही कोणी घुसखोरी करू लागले आहे काय? कुठे चीन तर कुठे पाकिस्तान रोज घुसखोरी करीत आहे, पण मुख्यमंत्रीपद गेल्यावर अमरिंदर यांना सीमा सुरक्षेबाबत जाग आली. देशाच्या गृहमंत्र्यांनाही त्याबद्दल जी बहुमोल माहिती मिळाली ती देशाला समजेल काय? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानेच अमरिंदर यांच्याप्रमाणेच आम्हालाही चिंता वाटते,’
















