धरणगाव (प्रतिनिधी) स्व. बाळासाहेबांनी ज्यांना लहानाचे मोठे केले. त्यांनी शिवसेनेवर बोलताना जरा भान ठेवावे. तसेच असे कितीही कोंबडी चोर आलेत तरी शिवसेना नरमणार नाही. उलट त्वेषाने पेटून उठेल, असा इशारा जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर आज श्री. वाघ यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करून उत्तर दिले.
जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आपल्या शैलीत नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. नारायण राणे व त्यांच्या पुत्रांनी स्वतःच्या तोंडावर आवर घालावा अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. ज्या शिवसेनेने तुम्हाला लहानाचे मोठे केले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसविले. आज त्याच शिवसेनेवर आपण जर जहरी टीका करत असाल तर याद राखा. आपल्याला ज्या कोणी मंत्रिपद दिले असेल, त्यांनी ते का दिले?, हे महाराष्ट्राच्या मायबाप जनता जनार्दनाला माहित आहे. केवळ आकसापोटी शिवसेनेवर बोलण्यासाठी व मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठीच यांना हे मंत्रिपद दिले असावे असे वाटते. नाशिक येथे त्यांनी जे काही बेताल वक्तव्य केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून याचे पडसाद उमटत असून शिवसेना याला चोख उत्तर देईलच, असे श्री. वाघ यांनी सांगितले. धरणगाव शिवसेना तालुका शिवसेना व जिल्हा शिवसेना तसेच पालकमंत्र्यांकडून निषेध नोंदवत गुलाबराव वाघ यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करत धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना निवेदनाची प्रत देऊन लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी विनंती केली. यावेळी समस्त शिवसेना पदाधिकारी, सर्व नगरसेवक व शिवसैनिक यांच्याकडून कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून पुन्हा एकदा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना गटनेते पप्पू भावे, तालुका उपप्रमुख राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक त्याच प्रमाणे सर्व शिवसैनिक निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.