मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपतर्फे राज्यभरात सरकारच्या कारभाराविरोधात पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर ‘तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
संजय राऊत हे दररोज वेगवेगळी वक्तव्ये करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांना राऊत हेच जास्त प्रिय आहे. सामना म्हणजे संजय राऊत, संजय राऊत म्हणजे सामना असं आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता.
चंद्रकांत पाटलांचा या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे आणि माझी नियुक्तीही खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील रविवारी म्हणाले कि, मुख्यमंत्री दसरा मेळावा तसेच मुलाखतीमध्ये विरोधकांना बघून घेऊ, अशी भाषा वापरत आहेत. मुख्यमंत्र्यांना धमकीची भाषा शोभत नाही. वारंवार काय धमक्या देता, कारवाई करून पहा,’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री आव्हान दिले होते. तसेच राज्यात ‘ऍक्शन-रिऍक्शन’चा खेळ सुरू असून, त्याबाबत सर्वच पक्षांनी एकत्र बसून आचारसंहिता ठरविण्याची गरज असल्याचेही पाटील यांनी सांगितले होते.