धरणगाव (प्रतिनिधी) नियोजनाने व आम्ही केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने करण पवार यांना पराभव पत्करावा लागला, असा गंभीर आरोप धरणगाव कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत नुकताच केल्यामुळे धरणगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यानिमित्ताने महाविकास आघाडीतील धुसफूस समोर यायला सुरुवात झाली आहे.
धरणगाव येथील पक्ष कार्यालयात तालुका व शहर काँग्रेसतर्फे नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ व्ही.डी. पाटील यांनी आरोप केला की, जळगाव लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार करण पवार निवडून येण्यासारखी परिस्थिती असताना, उमेदवार स्ट्रॉंग असताना, शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे तसेच महागाईचे असंख्य प्रश्न असतांना ढिसाळ नियोजनाने व आम्ही केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने करण पवार यांना पराभव झाला. आघाडी बाहेरचे काही पक्ष मदत करतील, या भरवशावर राहून तसेच काँग्रेसने अनेकदा तालुक्यात चौक सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याची सूचना करूनही धरणगाव तालुक्यात एकही सभा तर सोडाच पण चौकसभाही झाली नाही. त्यामुळेच मुख्यतः करण पवारांना पराभव पत्करावा लागला. या पत्रकार परिषदेत डॉ व्ही.डी. पाटील यांनी धरणगाव शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना भरपूर मतदान झाल्याने धरणगाव शहर हे संघ, भाजपचा गड आहे ही अतिशयोक्ती व जाणीवपूर्वक पसरवलेला भ्रम असल्याचे म्हटले.
या पत्रकार परिषदेत धरणगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष अनंत परिहार यांनी देखील गंभीर आरोप लावत म्हटले की, आम्ही काँग्रेस पक्षातर्फे अनेकदा तालुक्यात ‘हात से हात जोडो’, जनसंवाद यात्रा, कापूस दिंडी यासारख्या अनेक मोहिमा राबविल्याने जनतेशी संवाद साधण्याचा वेगळा फायदा असतो. त्यासाठी या निवडणुकीत चौकसभा घ्या, असे अनेकदा मीही सुचवले होते, असे अनंत परिहार म्हणाले. आम्ही याबाबतचा अहवाल जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार यांना पाठविणार असल्याचे डॉ व्ही.डी. पाटील यांनी नमूद केले. करण पवार विजयी झाले असते तर त्याचे श्रेय आम्हालाही मिळाले, असते असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला डॉ.व्ही.डी. पाटील, अनंत परिहार यांच्यासोबतच धरणगाव तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रमुख साजिद पटेल, धरणगाव शहर सरचिटणीस नंदलाल महाजन, धरणगाव शहर अल्पसंख्याक सेलचे उपप्रमुख सलीम बेलदार, काँग्रेस आदिवासी सेलचे जळगाव जिल्हा सचिव ताराचंद महाराज, गणेश सोनवणे, सलमान मणियार, बाळू पाटील हजर होते.