शिंदखेडा (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे निष्ठवंतांचा संवाद दौरा हा कार्यक्रम राबवित आहेत. या कार्यक्रमा अंतर्गत ते राज्याभर दौरा करून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेऊन पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या कार्यक्रमा अंतर्गत जयंतराव पाटिल यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला.
यात दि.२२ जुलै सोमवार रोजी शिंदखेडा येथील मनमिरा मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिंदखेडा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निष्ठवंतांशी संवाद मेळावा आणि माजी जि.प. उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब निकम यांच्या भारतीय जनता पक्षातील समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी रोहिणीताई म्हणाल्या की, येथे आलेल्या लोकांचा उत्साह बघुन विश्वास बघून जाणवतेय की, आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या लंकेचे दहन होणार आहे आणि बदल घडणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो, कार्यकर्ता बदल करायचा आहे, असे ठरवतो तेव्हा बदल निश्चित घडतो. लोकसभा निवडणुकीत आपण हे अनुभवले. महायुतीचे पदाधिकारी हे जनतेने त्यांना सत्ता हि आयुष्य भरासाठी दिली आहे, या अविर्भावात वावरत होते पण जनतेने त्यांना जमिनीवर आणले. कामराज निकम यांच्या सारखे लोक भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आले. आम्ही सुद्धा आधी भाजपामध्ये होतो, आम्हाला माहितीय की, भाजपमध्ये निष्ठावंतांचा वापर करून घेतला जातो. सतरंज्या उचलायला लावल्या जातात. परंतु काम झाले की, निष्ठवंतांना वाऱ्यावर सोडले जाते, याचे उदाहरण कामराज निकम आणि आम्ही आहोत.
आता भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना पदे दिली जातात, त्यांची कामे केली जातात. परंतु ज्यांनी अनेक वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केले त्यांना किंमत दिली जात नाही. परंतु लोकसभा निवडणुकी नंतर भाजपला आता जुन्या लोकांची गरज जाणवायला लागली आहे. जुन्या लोकांची आठवण यायला लागली आहे, म्हणून पंकजाताई मुंडे यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली. जुन्या लोकांना संधी देऊन फाटलेले शिवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु जो हौदोसे गयी वो बुंदोसे नही आती. आपणा सर्वांवरती विश्वास आहे, या मतदारसंघात बदल घडवायचा हे ठरवून आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेत ते नक्की कराल याचा विश्वास आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे उभे राहून बदल घडवायचा आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून सिंचनाचे व इतर अनेक कामे झाली. त्याच्या विश्वासावर इथल्या मतदारांनी अनेक वर्षे इथल्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले. धुळे नंदुरबार जिल्ह्यात एकनाथराव खडसे यांनी अनेक सिंचनाच्या प्रकल्पांची कामे केली. त्यातून शेतीपर्यंत पाणी पोहचले. काही प्रकल्पांचे काम अर्धवट होते. जयंतराव पाटिल जलसंपदा मंत्री असताना त्यांनी या प्रकल्पांना निधी दिला. परंतु आपण बघितले गेल्या दोन वर्षात सर्व प्रकल्पांचे काम थंडावले. कुठेही सिंचन प्रकल्पाचे काम सुरू नाही, म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला बदल घडवायचा आहे. आपल्या हक्काचा आमदार निवडुन द्यायचाआहे. जोपर्यंत हक्काचा आमदार निवडून देणार नाही, तोपर्यंत आपले कामे होणार नाही. आपले प्रश्न मार्गी लागणार नाही, म्हणून सर्वांना विनंती आहे की, आपल्या हक्काचा आमदार निवडून द्या.
लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर सत्ताधाऱ्यांना भिती वाटत आहे म्हणून वेगवेगळ्या योजना जाहिर होत आहेत. लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना आणली अजून योजना येतील पण सर्वांनी विचारपूर्वक मतदान करायचे आहे. लाडकी बहिण योजने अंतर्गत माता भगिनींना महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे दिवसाला पन्नास रुपये मिळणार आहेत. पण हा पैसा आपल्याकडूनच वसुल करण्यात आला आहे, याचा विचार करा. महिलांच्या काचेच्या बांगड्यांवर अठरा टक्के जिएसटी गेल्या दहा वर्षात गॅस, पेट्रोल डिझेल चे दर चार पटीने वाढले ,शेतकऱ्यांच्या खते बियाण्यांवर अठरा टक्के जिएसटी लावला जातो, म्हणजे जनतेच्या खिशातून पैसा काढला जातो. म्हणून हा आपलाच पैसा आहे आवळा देऊन कोहळा काढला जात आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा आमदार निवडून देण्याचे आवाहन देखील रोहिणीताई खडसे यांनी उपस्थितांना केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुबभाई शेख,प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, माजी जि प उपाध्यक्ष कामराज निकम, उमेश पाटिल, जुई देशमुख, हेमा ताई शितोळे, जितेंद्र मराठे, उषाताई पाटिल, मनोज महाजन, कैलास ठाकरे, जितेंद्र ठाकूर, ललित वारुळे, अरुण पाटिल, त्र्यंबक पहेलवान, प्रकाश पाटिल, पोपट सोनवणे, वल्लभ सोनवणे, महेंद्र निकम, चंद्रराव साळुंखे, नितीन चौधरी, कय्युम पठाण, कमलाकर बागले, उल्हास देशमुख आणि पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी उपस्थित होते.