जळगाव (प्रतिनिधी) महायुतीच्या तिन्ही मंत्री व सर्व आमदार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीत आहेत. म्हणून विरोधकांच्या अशा आंदोलनांना जनता बळी पडणार नाही, परंतु आजपर्यंत आपण काय बोंब पाडली आहे. आपण काय काम केले हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या समोर सांगावे, असे आव्हान शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी दिले आहे.
माजी खासदार उन्मेश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर व गुलाबराव वाघ हे महाविकास आघाडीतील इतर नेते जे कधीच ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून सुद्धा येऊ शकत नाही, अशा लोकांच्या तोंडून ते महायुतीच्या नेते यांच्या बाबतीत सोंगाड्या, चंगू, मंगू अशा पद्धतीने वक्तव्य करायला लावत आहे, मात्र, तुमच्यात धमक असेल तर महायुतीच्या नेत्यांपेक्षा जास्त कामे तुम्ही करून दाखवा, असेही निलेश पाटील म्हणाले. तसेच यापुढे जर आमच्या नेत्यांविषयी असे वक्तव्य केले तर, खबरदार… आम्हालाही तशाच भाषेत तुमच्या नेत्यांबाबत बोलावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
त्यांना पथनाट्यच करावे लागणार उन्मेश पाटील यांनी एक तरी ठळक काम शेतकरी बांधवांसाठी केले असेल तर ते दाखवावे, उन्मेश पाटलांकडून फक्त इतरांना नावे ठेवण्याचे काम केले जात असून निवणुकीत अपयश आल्यामुळे ते निराश होऊन अशा पद्धतीचं पथनाट्य करत आहेत. यापुढे देखील त्यांच्यावर पथनाट्यच करण्याची वेळ येणार आहे.
















