अमरावती (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकावरून देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारनेही कृषी विधेयकावर आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे. त्यातच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘जर मोदींनी त्या दोन ओळी कृषी विधेयकात टाकल्या तर भाजपात प्रवेश करू’, असे आव्हानच दिले आहे.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, ‘आम्ही हे बिल जसेच्या तसे स्वीकारायला तयार आहोत, पंतप्रधान मोदी जसे 56 इंच छाती असल्याचे सांगतात. त्याप्रमाणे त्यांनी या विधेयकामध्ये केवळ दोन ओळी टाकाव्यात. शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ व याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं केल्यास मी भाजपात प्रवेश करेल, असं बच्चू कडू यांनी सांगितले. तसंच, हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात भाजपच्या महिला नेत्या गप्प असल्याने, महिला अत्याचार प्रकरणात पक्ष न पाहता महिलांनी पुढे यावे’ असं आवाहनही कडू यांनी केले.
तसंच, हाथरस प्रकरणात राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की हे मोगलाईचे लक्षण आहे, अशी टीकाही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. दरम्यान, कृषी विधेयकाला महाविकास आघाडीने सरकारने विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने कृषी विधेयकाला उघडपणे विरोध केला आहे. तर राष्ट्रवादीनेही कृषी विधेयकाला विरोध करत काँग्रेसच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
















