मुंबई (वृत्तसंस्था) इंडस्ट्रीकडे केवळ करमणूक करणारं क्षेत्र म्हणून पाहिले जाते. पण रडविण्यापेक्षा हसविणे फार अवघड असते आणि ती ताकद या माध्यमात आहे. ‘मेरा नाम जोकर’मध्ये सगळ्यांना हसविणाऱ्या जोकरचं एक आयुष्य आहे, त्यालाही अश्रू येतात. त्याप्रमाणे या इंडस्ट्रीला येणारे अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते चित्रपट क्षेत्राशीसंबधित वेबिनार कार्यक्रमात बोलत होते
महाराष्ट्रात चित्रपट आणि करमणूक क्षेत्र अधिक बळकट करून त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे ते करू, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. दरम्यान, मध्येच चर्चा सुरु झाली की इथली चित्रपट सृष्टी उत्तर प्रदेशला नेणार म्हणून, तुमच्यात क्षमता असेल तर जरूर नेऊन दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. राज कपूर, देवानंद असो किंवा दिलीप कुमार, राजेश खन्ना सारखे कलाकार आणि अगदी मोहम्मद रफी, मन्ना डे हे गायक तसेच चांगले संगीतकार यांची कायम आमच्याकडे ये-जा असायची. या सर्वांनी एक ऋणानुबंध जपला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.