औरंगाबाद (वृत्तसंस्था) गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून राजकीय वाद आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेना गंभीर असून हीच ती अनुकूल वेळ असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.
ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद या शहराचं नाव संभाजीनगर असे केले होते. बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांना पाठिंबा देणारे दोन पक्ष देखील सत्तेत आहेत, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आता याबाबत लवकरच निर्णय घेतील, असे सुभाष देसाई म्हणाले. काही तांत्रिक समस्या असून त्यावर लवकरच तोडगा निघेल असेही ते पुढे म्हणाले. या पूर्वी विभागीय आयुक्तांकडे नामांतराबाबतचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. हे पाहता आता औरंगाबादचे संभाजीनगर असे नाव करण्याची ती वेळ आलेली आहे आणि लवकरच राज्य सरकार याबाबत निर्णय घेईल असे ते म्हणाले.