मुंबई (वृत्तसंस्था) मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यावर शनिवारी छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज राज ठाकरे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
काल राज ठाकरे यांना अचानक लीलावती रुग्णालायत दाखल करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (यांना बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही राज ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याशी लॉकडाऊनसंदर्भात काही चर्चा करणार का, हे पाहावे लागेल.
राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार शनिवारी लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
राज ठाकरे हे क्रीडा प्रेमी आहेत. जानेवारी महिन्यात टेनिस खेळताना त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याची माहिती तेव्हा समोर आली होती. त्यानंतर पक्षाच्या बैठकीवेळीही राज ठाकरे उपस्थित असताना हाताला प्लास्टर केलेलं असल्याचं दिसून आलं होतं.