मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आताच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची तब्बेत आता एकदम ठीक आहे. काहीवेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.
गेल्या १५ दिवसांमध्ये शरद पवार यांच्यावर झालेली ही दुसरी शस्त्रक्रिया आहे. ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीच शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती.