मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशी चर्चा होती. तो दिवस आज उजडला. शिवाजी महाराजांच्या जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी भेट झाली आहे. हे आमच्यासाठी सौभाग्य आहे. आमच्यातील सदिच्छ भेट होती, त्यात काही लपवण्यासारखे नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात आज बैठक झाली.
देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचं भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झाली. संपूर्ण देशात राज्य एकमेंकाचा शेजारधर्म विसरले आहेत. पण राज्याराज्यात चांगले वातावरण राहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ – चंद्रशेखर राव
चंद्रशेखर राव म्हणाले, महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे. के. चंद्रशेखर राव म्हणाले, ” भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशातील परिस्थीवर बोलण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. त्यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना भेटून खूप आनंद झाला. देशाच्या विकासाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण देणार आहे. तेथे आम्ही एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत.”