मुंबई (वृत्तसंस्था) ज्ञानवापी प्रकरणावर (gyanvapi case) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाने विनाकारण वाद उकरून काढू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणावर भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाने हे लक्षात घेतले पाहिजे की, या देशाला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. त्यावेळी जसा देश मिळाला, तसाच देश ठेवावा. सध्याच्या ज्ञानवापी प्रकरणावरून म्हणायला गेलं तर, अशोकाच्या काळात विहारे होती, ती कुठे गेली ?, यावर सुप्रीम कोर्टाकडे उत्तर आहे का ?’. ‘वाद उकरून काढण्यासाठी सुप्रीम कोर्ट नाही. देशात शांतता पाहिजे की अशांतता हे लोकांनी ठरवलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकाराने केला आहे. त्यामुळे या ठिकाणी मंदिर असल्याचा दावा केला आहे. देशभर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. या मशिदीच्या परिसरात शिवलिंग हे वजूखान्यासाठीचा कारंजा असल्याचा दावा मुस्लिम पक्षकारांनी केला आहे. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असून, यावर पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.