मुंबई (वृत्तसंस्था) केवळ मराठी भाषिक नाहीत म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी तत्कालीन आमदार सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायला नकार दिला होता, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी अनेक वर्षानंतर केला. विधान भवनात बाळासाहेबांचे तैलचित्र अनावरण प्रसंगी ते बोलत होते. (Raj Thackeray on Balasaheb Thackeray)
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणी यावेळी सांगितल्या. त्या ओघात त्यांची मराठी भाषिकांविषयीची भूमिका सांगताना राज यांनी सुरेश जैन यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, एके दिवशी दुपारच्या वेळेला ‘मातोश्री’वर दोन गाड्या आल्या. जावडेकर आणि आणखी भाजपचे दोन-चार जण आले. बाळासाहेबांना भेटायचय म्हणाले. आज आपलं सरकार बसेन, त्यामुळे बाळासाहेबांची भेट महत्त्वाची आहे म्हणाले. परंतु बाळासाहेब झोपले होते. राज ठाकरे म्हणाले निरोप देतो पण भेट शक्य नाही.
बाळासाहेब झोपले होते. राज ठाकरेंनी त्यांना उठवून निरोप दिला की, भाजपचे नेते आले आहेत, त्यांनी सांगितलंय की संध्याकाळपर्यंत सरकार बसेल. सुरेश जैन मुख्यमंत्री असतील ते आमदारांची जुळवाजुळव करतील. ते पुरेसे आमदार खेचून आणणार आहेत. बाळासाहेबांना झोपेतून उठवून हा निरोप दिला, तर जैन यांचे नाव ऐकताच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच असेल, चल जा. त्यांना जावून सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच असेल दुसरा असणार नाही, असं म्हणून ते पुन्हा झोपी गेले. बाळासाहेबांनी सत्तेवर पाणी सोडले; पण मराठी विषयीची भूमिका सोडली नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगीतले.