मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीची सोय स्थानिक प्रशासन करणार असून शासकीय केंद्रात आरटीपीसीआर चाचणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच शाळांतील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा सर्व खर्च स्थानिक प्रशासन उचलणार आहे. महत्वाचे म्हणजे या चाचण्या मोफत असणार असून याचा खर्च सरकार उचलणार आहे.
कोरोनाच्या संटकामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, काही अटींवर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतची शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या संबंधित सर्व शिक्षकांची कोरोना तपासणीसाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांच्या आरटीपीसीआर चीचणीची जबाबदारी स्थानिक प्रशासन अर्थात महापालिका आणि जिल्हा परिषदांवर सोपवण्यात आलीय.यात शिक्षकांची तपासणी, शाळेचे सॅनिटायझेशन आणि आरोग्य यंत्रणेच्या जबाबदारीचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून शाळा, महाविद्यालये सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रोगाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
मंगळवारपासून शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली जाणार होती. मात्र शालेय शिक्षण विभागाच्या संदिग्ध सूचनांमुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.अखेर शालेय विभागास आज जाग आली आणि विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी पत्र जारी केले असून, चाचणीसंदर्भात तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या खर्चाबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.