मुंबई (वृत्तसंस्था) मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा (Maharashtra SSC HSC Examination 2022) या नियोजित वेळेतच होणार असल्याचं राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केलं आहे. यासोबतच दहावी आणि बारावी या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत असंही बोर्डाने सांगितलं आहे.
प्रश्न पत्रिकेचं स्वरुप कसं असेल?
प्रश्नपञिका ही मिक्स स्वरूपाची असेल. एका वाक्यासोबतच लघु आणि दीर्घ उत्तरी परीक्षा असेल. परीक्षांच्या तारखा आता बदलणार नाही. परीक्षा काळात कोविड पॉझिटिव्ह येणाऱ्या परीक्षार्थींना पुरवणी परीक्षा देण्याची संधी मिळेल. जुलैमध्ये पुरवणी परीक्षा होऊ शकते अशी माहिती बोर्डाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक ठरलं आहे. त्यानुसार 12वीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या काळात ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात येतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत.
शाळेतच असणार परीक्षा केंद्र
कोविड असल्याने यावर्षी शाळा तिथं परीक्षा केंद्र असेल. थोडक्यात आपल्याच शाळेत मुलांना परीक्षा देता येईल. 15 पेक्षा अधिक परीक्षार्थी असलेल्या शाळांना उपकेंद्र मिळेल तर 15 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांना जवळचे परीक्षा केंद्र मिळेल अशी माहितीही शिक्षण मंडळाने दिली आहे.
सोशल डिस्टन्सिंगसाठी काय?
कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगसाठी विद्यार्थ्यांना झिगझॅग पद्धतीने बसवण्यात येणार आहे असंही शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ
पेपर साडे दहा वाजता सुरू होईल. परीक्षार्थींना अर्धा तास वाढीव वेळ मिळेल. १०० मार्कांसाठी ३० मिनिटांचा तर ४० मार्कांसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ मिळेल. यावर्षी आम्ही १५ दिवस उशिराने परीक्षा घेतोय त्यामुळे मुलांच्या मागणीनुसार आम्ही आधीच कालावधी वाढून दिला आहे.
कॉपी रोखण्यासाठी भरारी पथक
यावर्षी प्रक्टिकलसाठी बाहेरचा परीक्षक नसेल तर त्याच शाळेतील शिक्षक असतील. ऑफलाईन परीक्षेसाठी परीक्षक त्याच शाळेतला असेल की बाहेरचा हा निर्णय अजून झालेला नाहीये. एकूण ३० हजार परीक्षा केंद्र असतील. तसेच कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकं नेमणार असंही शिक्षण विभागाने सांगितलं आहे.