मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गेल्यानंतर शिवसैनिकांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं होत. या प्रकरणावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेवर केली.
शुद्धीकरणाच्या प्रकारावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला. “ज्या लोकांनी हे केलं असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे, एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली असं सांगता. ही कृती अतिशय अयोग्य आहे”, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.