नागपूर (वृत्तसंस्था) आपण गावगुंड मोदीबद्दल बोललो होतो असा दावा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. ज्या गावगुंडाचा उल्लेख नाना पटोलेंनी केला होता तो आता समोर आला आहे. नाना पटोलेंनी उल्लेख केलेला मीच तो गावगुंड आहे असे म्हणत उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस समर्थित वकील सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणलं.
भंडारा जिल्ह्याच्या गोंदी या गावातील हा गावगुंड मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्यानं नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द बोलले आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा अँड. सतीश उके यांनी केलाय. मुळात या मोदीचं मुळं नाव उमेश घरडे उर्फ मोदी असं आहे. अनेक लोकं त्याच्या मागे लागले त्यामुळं तो घाबरून आपल्या कडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणल्याचं उके यांनी सांगितलं.
तथाकथित मोदी याला मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना चांगलाच घाम फुटला. आपण दारू विकत होतो, दारू पितो, पत्नी आपल्याला सोडून गेली, आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असं सांगत २०२० पासून आपल्याला मोदी असं टोपण नाव पडल्याचं सांगितलं. मात्र, मोदी नाव कसं पडलं हे मात्र सांगण्यास नकार दिला. पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तर अर्ध्यावर सोडून या मोदीनं अक्षरशः पळ काढला. त्यामुळं खरंच नानांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हाच होता, की तो हाच आहे असा केविलवाणा प्रयत्न होता, असा प्रश्न निर्माण झाला.
पटोलेंचा ‘मोदी’ आता अटकेत
मात्र, भंडारा पोलिसांनी आता अथक प्रयत्नांनंतर त्या गावगुंड मोदीला पकडले असून चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कथित गावगुंड मोदीची चौकशी सुरु आहे. तसेच या गुंडाचे टोपण नाव मोदी असे आहे. तर त्याचे पुर्ण नाव उमेश प्रेमचंद घरडे असे असून तो लाखनी तालुक्यातही गोंदी गावातील रहिवासी आहे. त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी व संपूर्ण परिवार नागपूर येथे राहतात. उमेश दोन वर्षांपासून गावातच एकटाच राहतो, दारू पिवून गावकऱ्यांना शिवीगाळ करतो. मात्र असे असले तरी त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये आतापर्यंत कोणताही गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही.
मात्र आता पोलिसांनी जरी कथित मोदीला पकडला असला तरी त्याच्याविरुद्ध एकही गुन्हा किंवा तक्रार नोंद नाही. त्यामुळे त्याला गावगुंड म्हणायचे कसे असा सवाल पोलिसांपुढे आहे. याचसोबतच नाना पटोले यांनी कोणत्या मोदी विषयी भाष्य केले हा देखील संशोधनाचा विषय आहे. पालांदूर पोलिसांनी उमेश घरडे यांची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे.
















