मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पायंडा पाडला आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाट्य घडवण्यात आले त्याची संहिता भाजप भाजप कार्यालयात लिहली गेली आणि त्या नाट्याचे महानायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झाले आहे. या सगळ्या प्रकारात राज्यपालांनी स्वत:चे पुरते वस्त्रहरण करून घेतल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.
सामनाच्या पुढील लेखात म्हटले आहे की, राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष जे बार उडवत आहे, ते फुसकेच ठरत आहेत. राज्य बहुमतावर चालते व सरकारकडे १७० आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला जनादेश नाही व ते घालवायला हवे, असे कारस्थान कोणाच्या भरवशावर चालले आहे.
अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना सुनावल्याची माहिती समोर येत आहे. राज्यपालांनी गेल्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र आणि अभिभाषणातील गोंधळाच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडीच्या मंत्र्यांसमोर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. माझे अभिभाषण सुरू असताना तुमच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा दिल्या, असे राज्यपालांनी म्हटले.
भाजपला दाऊदच्या नावाने राजकारण करायचे आहे. त्यासाठी विधिमंडळात घटनेचा बळी देण्यात आला. राज्यपालांनी त्यास साथ द्यावी, हे देशाचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्त्व करतात. तसेच शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करून निघून जातात. सत्ता गेली याचा इतका राग इतिहासात कोणी केला नसेल, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
अलीकडे लोक खाल्ल्या मिठाला जागताना दिसत नाहीत. पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जुन्या पक्षाच्या मिठास जागून महाविकासआघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले. त्यांनी जय हिंद किंवा जय महाराष्ट्रही म्हटले नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत. यापूर्वी अनेक राज्यांच्या विधानसभेत राज्यपालांच्या भाषणादरम्यान अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यामुळे कोणतेही राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून गेले नव्हते.