मुंबई (वृत्तसंस्था) राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी प्रचंड गोंधळ झाला होता. सभागृहातील सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) अभिभाषण अर्धवट सोडून माघारी परतले होते. या सगळ्या प्रकाराबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ९ तारखेला घेण्याची योजना असून त्याला राज्यपालांची मंजूरी आवश्यक आहे. ही मान्यता मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण, जयंत पाटील, नाना पटोले, अनिल परब, एकनाथ शिंदे आदींनी राज्यपालांची भेट घेतली. तेव्हा राज्यपालांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. त्यावर विधान परिषदेतील १२ नियुक्त सदस्यांचा प्रस्ताव अनेक दिवस प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधण्यात आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यावर कोश्यारी यांनी ठोस उत्तर दिले नाही, असे समजते.
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांशी चर्चा सुरू असताना राज्यपाल कोश्यारी यांनी अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळाचा विषय काढला. माझे अभिभाषण सुरू असताना तुमच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या, असा नाराजीचा सूर कोश्यारी यांनी लावला. त्यावर आघाडीच्या आमदारांनी शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या आणि ती तुमच्या स्वागतासाठी होती. घोषणा देऊन आमचे लोक शांत झाले होते, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले. त्यावर दाऊदचे नाव घेऊन घोषणाबाजी सुरू होती, असा प्रश्न कोश्यारी यांनी केला. त्यावर त्या घोषणा आघाडीच्या आमदारांनी नव्हे तर भाजपच्याच आमदारांनी दिल्या. तुमच्या भाषणात आघाडीच्या आमदारांनी नव्हे तर भाजपच्याच लोकांनी व्यत्यय आणला, असे जयंत पाटील यांनी पुन्हा निदर्शनास आणून दिले.
















