धरणगाव (राजेंद्र वाघ) “महावीर” यांचा जन्म लिच्छवि कुळात झाला आहे. महावीरांचे लिच्छवि कुळ आणि तथागत गौतम कुळ हे तत्कालीन समाजातील गणपदे होती. त्यांची राज्य-व्यवस्था ही आदर्श अशा “लोकशाही” म्हणजेच “गण पद्धती” ने चालत असे. भ. वर्धमान महावीरांनी आपल्याला मिळालेल्या या विचाराच्या वारशाला एक व्यापक स्वरूप दिले. “विचारांची व्यापकता आणि आचारांचे कठोर पालन” हे महावीरांच्या कार्यशैलीचे महत्वाचे पैलू होते.
आपल्याला मिळालेल्या विचारांच्या वारशाला महावीरांनी फुलवले, रुजवले आणि प्रसारित केले. ब्राम्हणी कर्मकांडात अडकवू पाहणाऱ्या भयभीत समाजाला महावीरांनी अहर्त व अनेकन्तवाद हा विचार देवून विवेकनिष्ठ बनवलेच, पण त्याच बरोबर एक समृद्ध समाज बनविण्यासाठी व्यापक स्वरुपात प्रयत्नही केले.
“जैन धर्म” हा कृषी संस्कृतीचीच विचार धारा चालवत होता. भारतीय मूलनिवासी समाजाने कायमच वेदांचा विरोध केला. यज्ञा सारख्या अमानुष कर्मकांडाना भारतीय मूलनिवासी समाजाने त्याच्या आरंभापासूनच नाकारले आहे. यज्ञात होणाऱ्या पशुहत्येस हा समाज कायम विरोध करत आला आहे. त्याने कोणत्याही पातळीवरील आर्यांचे विशेष स्थान नाकारले आहे. या विचारांचा धागा पकडून जैन तीर्थकारानी समाजात जागृती निर्माण करण्यास सुरूवात केली. केवळ विचारांच्या पातळीवर जैन धर्मियांनी मनुवादी व्यवस्थेचा विरोध केला असे नाही तर आचारांच्या पातळीवर एका विशिष्ट शिस्तीचे अनुकरण करुन आचरणाचे शुध्द स्वरूप समाजात निर्माण केले. जैन धर्मियांच्या या कडक आचरणामुळे व विचाराला जपणाऱ्या आचार निष्ठेमुळे जातीयवाद असलेला धर्माला व कर्मकांडाला जबरदस्त हादरा बसला.
जैन धर्मियांनी आपले तत्वज्ञान शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने प्रसारित केले. आपले मत त्यांनी इतरांवरती थोपवले नाही अथवा ना मानणाऱ्या वरती बळजबरीही केली नाही. आपले मत इतरांवरती लादून ना मानणााऱ्यांचे चरित्र हरण करणाऱ्या युरेशियन आर्यांचा त्यानी कायमच धिक्कार केला. प्रत्येकाला आपले आचार विचार पाळण्याचे स्वातंत्र्य असते परंतु, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते या तत्त्वाचा अंगीकार करून त्यांनी आपले विचार पसरविण्यास सुरूवात केली.
मुळात सिंधु संस्कृतीतून उगम पावलेल्या या विचारांचे आणि आचारांचे तत्कालीन समाजाने स्वागत केले व या क्रांतिकारक विचाराने समाजाला दिशा दिली. ते वेदांचा विरोध करतात, प्राणीहत्या यज्ञ याचा विरोध करतात, व मनुसंस्कृतीचे विशेष अधिकार नाकारतात म्हणून आर्य लिखित साहित्याने यांची घोर उपेक्षा केलीच आणि त्यांना बदनामही केले. त्यांना पाखंडी म्हणून हिणवले. मायामोह अशी हीन संज्ञा त्यांच्या करिता वापरली. तसेच विष्णूनेच त्यांचे रूप घेतले, असे निर्लज्जपणे सांगून, त्यांचे सांगणे, उपदेश आधीच ठरला होता असे दाखविण्याचा प्रकार केला. किळसवाना प्रकार तर हा आहे कि हे सर्व असुराना ( मूलनिवासी नागवंशीय ) फसविण्यासाठी केले हे सांगणे होय.
अखंड मानव जातीच्या उद्धाराकरिता आपल्या पूर्वजांनी दिलेल्या आचार विचार रुपी संपत्तीचे वाटप आपल्या भावंडामध्ये करण्याच्या व्यापक आणि निस्पृह हेतूने जैन तत्वज्ञान आणि मार्ग या देशात निर्माण झाला आहे. आणि त्याने आपल्या भावंडांचे कल्याणच केले आहे. तो एक स्वातंत्र्य, मानव मुक्तीचा कार्यक्रम आणि तर्क संगत मार्ग आहे. परंतु आज सद्य स्थितीला तो आर्य संस्कृतीतला एक भाग, शाखा, पंथ असल्याचा प्रचार आणि प्रसार मनुवादी प्रसार माध्यमे लेखक कवी, तत्ववेत्ते, पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत करत आहेत, आणि तथाकथित सरकार या वृत्तीस पाठींबा देत आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या Maharashtra : Land & Its People या ग्रंथाच्या पृष्ठ क्रमांक ३०८ वर जैन धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग असल्याचा उल्लेख आहे. वास्तव हे वेगळे एका साम असून त्याचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही.
महावीरांचा हा जैन धर्म भारतीय मूलनिवासी समाजाने मोठ्या प्रमाणात स्वीकारला. व्यापारात अग्रणी असणाऱ्या भारतीय मूलनिवासी “पणि” या लोक समूहात जैन धर्म फारच लोकप्रिय झाला. पाणि लोकांनी आपल्या व्यापाराच्या माध्यमातून इतर देशात याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. सुमेरीयाच्या उत्खननातही महावीरांची मूर्ती सापडलेली आहे. – मार्शल मंथन
२५०० वर्षापूर्वी म्हणजे इ.स. पूर्व ५९९ वर्ष कुंडलग्राम येथे राजा सिद्धार्थ व माता त्रिशला यांना जो वीर पुत्र झाला ते म्हणजे वीर, अतिवीर, वर्धमान, सन्मति या नावांनी परिचित असलेले भगवान महावीर जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर वर्तमान शासन नायक. केवळ ३० वर्षाच्या वयात राज वैभवाचा त्याग करून अखंड १२ वर्षे खडतर तपस्या, साधना केली आणि एक दिव्य ज्ञान, केवल ज्ञान प्राप्त केल्यानंतर जगतामधील अखिल मानवजातीसाठी उपदेश केला.
पंचशील तत्वाच्या साह्याने मनुष्याचे जीवन सरळ केले.
अंहिसा, अपरिग्रह, असत्य, अचौर्य आणि ब्रम्हचर्य.
“जिओ और जिने दो” ह्या सूत्रातून सर्वोदयी असा आणि काळ, वेळ, स्थळ, जात यांच्या सीमेच्या पलीकडे जावून मानवजातीला अदभूत असा सिध्दांत दिला.
आज अनिश्चिततेच्या आणि अस्वस्थेतेच्या वातावरणात भगवान महावीरांचा उपदेश खूप महत्वाचा आहे. भ. महावीर सांगतात, धर्म ही सांगायची गोष्ट नसून आचरणात आणायची गोष्ट आहे, मनुष्याने आपले नैतिक स्वातंत्र्य अबाधित राखावे, स्रियांच्या सन्मान व समानता, यज्ञासाठी प्राण्यांची हिंसा, यज्ञात वाया जाणारे तेल, तूप, धान्य याचा निषेध करून संयम व शुद्ध आचरणाचा मार्ग जनतेला सांगून समता व शांतीचा संदेश दिला आहे.
२५०० वर्षानंतरही भगवान महावीरांचे नामस्मरण तेवढयाच श्रद्धेने आणि भक्तीने जगभर केले जाते. त्याचे मूळ कारण म्हणजेच त्यांनी अखिल मानवजातीला
दाखविलेला सरळ-सोपा पण शाश्वत आणि आत्मिक सुखाची प्राप्ती करून देणारा मार्ग होय.
कर्मकांड, अवडंबर, व भितीच्या ओझ्याखाली दबलेल्या भारतीय जनमानसाला जगण्याचा शुद्ध मार्ग दाखवणारे तसेच सत्य, अहिंसा, अपरिग्रह व मानवतेची शिकवण देणारे लिच्छवी गणातील महान दार्शनिक, धम्म संस्कृती अर्थात श्रमण संस्कृतीचे विद्रोही “नागवंशीय मुनी” व अखिल मानवजातीला प्रकाश दाखविणाऱ्या भगवान महावीर यांच्या २६१९ व्या जन्मजयंती निमित्त शत शत त्रिवार वंदन..!!
आज चैत्र शुक्ल त्रयोदशी, ६ एप्रिल २०२१ भ. महावीरांचा जन्मोत्सव
संकलन
राजेंद्र वाघ (माळी)
धरणगाव, जि. जळगाव
मो. ९४२२९४१३३३