मुंबई :देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जैन समाजाने सातत्यपूर्ण योगदान दिलेले आहे. या पुढील काळातही जैन समाज आपले सर्वोच्च योगदान महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासासाठी देईल असा निर्धार जैन समाजाच्या नीती निर्धारण संमेलन प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ या समस्त जैन समाजाच्या राष्ट्रीय शिखर संस्थेतर्फे नीती निर्धारण संमेलन, संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक, महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या जैन आमदारांचा सत्कार व महाराष्ट्र सरकारने नव्याने बनवलेल्या जैन आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाची रूपरेषा असा संयुक्त कार्यक्रम सिडेनहम कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाला. त्याप्रसंगी अध्यक्ष भाषणात मार्गदर्शन करताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी जितो अपेक्स चे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, रुणवाल समूहाचे प्रमुख सुभाष रुणवाल, भारत जैन महामंडळाचे अध्यक्ष सी.सी. डांगी तसेच नवनिर्वाचित आमदार चैनसुख संचेती, राजेंद्र यड्रावकर, नरेंद्र मेहता, राहुल आवाडे, अल्पसंख्याक आयोग उपाध्यक्ष चेतन देडिया, जैन महामंडळाचे उपाध्यक्ष नितेश नाहटा, राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते ललित गांधी पुढे म्हणाले की जैन समाज व्यापार उद्योग या क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याने सर्वाधिक रोजगार देणारा समाज म्हणून ओळख निर्माण करण्याबरोबरच सर्वाधिक कर भरणारा तसेच सामाजिक क्षेत्रात सर्वाधिक योगदान देणारा समाज म्हणून ओळखला जातो. येणाऱ्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्र सह देशाच्या विविध भागांमध्ये शिक्षण, आरोग्य, प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये विशेष सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबरच युवकांना व्यापार उद्योगात प्रोत्साहन करण्यासाठीचे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. पृथ्वीराज कोठारी यांनी jito च्या माध्यमातून प्रशासकीय सेवे मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या प्रशिक्षण योजनेबद्दल ची माहिती दिली.
भारत जैन महामंडळाचे अध्यक्ष सी सी. डांगी यांनी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे उपक्रमांमध्ये संस्थेचे सहयोग दिले जाईल अशी घोषणा केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगावे यांनीही आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
आमदार चैनसुख संचिती यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेत जैन समाजाने या पुढील काळामध्ये राज्याच्या विकासामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देण्यासाठी विशेष पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जैन एकतेची आवश्यकता व अन्य समाजासाठी आदर्शवत असे काम उभारण्याची गरज प्रतिपादन केली.
राहुल आवाडे यांनी विधानसभेत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा राज्याच्या विकासासाठी उपयोग करू व युवकांना अधिकाधिक व्यापार उद्योगांमध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करू असे सांगितले.
आमदार नरेंद्र मेहता यांनी जैन समाजाने दिलेल्या विविध योगदानांचा गौरवपूर्ण उल्लेख करून, या पुढील काळातही जाहीर समाज आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवेल अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी तमिळनाडू अल्पसंख्यांक आयोग चे सदस्य प्रवीण टाटिया, कर्नाटका अल्पसंख्यांक आयोगचे सदस्य महेंद्र सोळंकी, राष्ट्रीय संयुक्त मंत्री सौरभ भंडारी (रतलाम) मध्य प्रदेश महासंघचे अध्यक्ष उमेश जैन, हैदराबाद महासंघाचे संयोजक मुकेश चव्हाण, गुजरात महासंघचे प्रदेश संयोजक राजेश रंका, महासंघाच्या राष्ट्रीय महिला प्रमुख रुचिरा सुराणा, राष्ट्रीय सहमंत्री विकास अच्छा, फॉम चे जितेंद्र शाह भाजपा जैन प्रकोष्ठ चे उपाध्यक्ष किशोर भंडारी, कार्यकारिणी सदस्य कांतीलाल राका व महाराष्ट्रच्या विविध जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांनी केले.