मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने मध्यरात्रीनंतर अटक केली आहे. यानंतर संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच घरातून जप्त केलेल्या दहा लाखांच्या रोकडवर ‘एकनाथ शिंदें’चं नाव असल्याचा आरोप देखील सुनील राऊतांनी केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
संजय राऊतांची रविवारी सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते. ईडी अधिकाऱ्यांची तीन पथकं संजय राऊतांविरोधात तपास करत होते. अखेर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. मात्र, खोटी केस तयार करून संजय राऊतांनी अटक करण्यात आल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे. यात पत्राचाळीचा उल्लेख कुठेही नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. सकाळी 9 वाजता राऊतांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यांची तब्येत एकदम ठीक आहे. ही खोटी केस दाखवली असून लवकरच संजय राऊत बाहेर येतील. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, असंही सुनील राऊत म्हणाले. संजय राऊत आणि शिवसेनेचा आवाज दाबवण्यासाठी ही खोटी कारवाई केली गेली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, पत्राचाळ हा 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.
मी संजय राऊत यांना भेटलो, ते ओके आहेत, बिनधास्त आहेत. त्यांना काही टेन्शन किंवा भीती नाही. दहा लाखांची जी कॅश सापडली, त्याच्यावर ज्यांनी ताबा घेतला, त्यावेळी लिहिलं होतं अयोध्या आणि एकनाथ शिंदे ते अयोध्याला गेले होते, त्याचं काँट्रिब्युशन होतं, ते पक्षाचे पैसे आहेत आणि पक्ष कार्यालयात जमा होणार होते. आम्ही न्यायालयीन लढाई लढणार. तुम्ही रामायण-महाभारत बघा, सत्याचाच विजय होतो. संजय राऊत यांना काही दिवसात न्याय मिळेल, भाजप राऊतांना घाबरली म्हणून अटक केली, असा गंभीर आरोपही सुनील राऊत यांनी केला.