मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज इशारा दिला असून हे आंदोलनाला हिंसक वळणं लागणाचे चित्र दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “नाव शेतकरी कायदा मात्र संपूर्ण फायदा अब्जाधीश मित्रांचा. शेतकरी कायदा शेतकऱ्यांशी चर्चा न करता कसा बनू शकतो? त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताकडे कसे दुर्लक्ष केले जाऊ शकते? सरकारला शेतकऱ्यांचे म्हणने ऐकावे लागेल. या सर्वजन मिळून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवू ” असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. ज्यामध्ये, “सरकारकडे आमची मागणी आहे की, आपल्या अधिकारांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात हिंसा व अत्याचार बंद करा. शेतकऱ्यांचा आवाज व त्यांच्या व्यथा ऐका” असं सांगण्यात आलेलं आहे.
केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी मोठ्याप्रमाणावर आक्रमक झाले आहेत. तर, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असा मागील चार दिवस दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज इशारा दिला आहे. एकूणच हे आंदोलन अधिकच चिघळत चालल्याचं दिसत आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
शेतकरी आंदोलनावरून या अगोदर देखील प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे. “भाजपा सरकारच्या काळात देशातील परिस्थिती पाहा. जेव्हा भाजपाचे अब्जाधीश मित्र दिल्लीत येतात तेव्हा त्यांच्यासाठी लाल चादर पसरली जाते. परंतु शेतकऱ्यांना दिल्लीत येताना रस्त्यात अडथळे निर्माण केले जातात. त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे तयार केले ते चालतं. परंतु सरकारसमोर ते आपलं म्हणणं मांडण्यासाठी आले तर ते चुकीचं?,” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं.