चाळीसगाव (प्रतिनिधी) नव्या वर्षाचे स्वागत धुंदीत नाही तर शुद्धीत करा… द… दारूचा नाही तर द… दुधाचा शेती अर्थव्यवस्थेला चालना द्या… असा संदेश देत चाळीसगाव (Chalisgaon) मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण (Mla Mangesh Chavhan) यांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्ट च्या रात्री “दूध पार्टी”चे आयोजन केले होते. आपल्या टाकळी प्रचा येथील निवासस्थानी आमदार चव्हाण यांनी राबविलेल्या या अभिनव संकल्पनेला तरूणाई सह आबालवृद्ध यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गरमागरम भजी व मसाला दूध अश्या बेताचा आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत आस्वाद घेतला.
सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि नव्या वर्षाचे आगमन अवघ्या जगभरात उत्साहात साजरे केले जाते. थर्टी फर्स्ट ची रात्री ठिकठिकाणी मेजवाण्यांचे, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, अलीकडच्या काळात हा दिवस साजरा करत असताना विशेषतः तरूण पिढी ही ओल्या पार्ट्यांच्या माध्यमातून व्यसनाधीनतकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षातून एक दिवस काय होत ? ही मानसिकता तसेच एकच तर दिवस पार्टी ला जातोय… या विचाराने कुटुंबाचे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक तरुण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच व्यसनाच्या आहारी जातात. या सर्व प्रकारांना कुठेतरी आळा बसावा तसेच चाळीसगाव तालुक्यात व्यसनमुक्ती चा संदेश जावा यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी “थर्टी फर्स्ट दूध पार्टी” चे आयोजन केले होते.
आपण व्यसनमुक्त असू तरच इतरांना सांगण्याचा आपल्याला अधिकार : आमदार मंगेश चव्हाण
नवीन वर्षाची सुरुवात धुंदीत नाही तर शुद्धीत व्हावी तसेच व्यसनमुक्तीचा प्रचार – प्रसार व्हावा यासाठी दूध पार्टी”चे आयोजन करण्यात आले होते. वारकरी कुटुंबातील असल्याने सुदैवाने मी व्यसनापासून दूर राहिलो मात्रउद्योग- व्यवसाय- राजकारण- समाजकारण करत असताना व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त होताना मी पाहिले आहे. मी माझ्या निवडणुकीत देखील दारू पार्ट्या यावर एक रुपया खर्च केला नाही तसेच मी स्वतः निर्व्यसनी असल्याने माझ्या चाळीसगाव मतदारसंघातील तरुण पिढीला निर्व्यसनी राहा, व्यसन करायचेच तर उद्योग – व्यवसायाचे करा असा सल्ला देऊ शकतो अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली.