जळगाव (प्रतिनिधी) एकदा प्रेमविवाह झाल्यानंतरही मुलीचे दुसऱ्याच मुलाशी आई, वडिलांनी लग्न लावून दिले. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात प्रियकराने त्या तरुणाला तू लग्न केलेली मुलगी माझी बायको आहे, आमचा प्रेमविवाह झाला असल्याचे कळविले. यानंतर संतापलेल्या तरुणाने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पत्नीसह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या दोघांचे ३ मे २०२१ रोजी औरंगाबादेत लग्न झाले. त्यानंतर मुलगी घरी आली, काही दिवस तिला घरी सोडून तो नोकरीच्या ठिकाणी गेला. नंतर पत्नीलाही घेऊन गेला. तेथे पत्नीची वागणूक व्यवस्थित नव्हती. पतीच्या मोबाइलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यात तू ज्या मुलीशी लग्न केले आहे, तिच्याशी माझा प्रेमविवाह झाल्याचे त्याने सांगितले. तो प्रियकर तरुणाला पुण्यात भेटला. पतीने जळगाव गाठून पत्नीच्या आई, वडिलांना बोलावून घेतले. त्यांना त्या दोघांचे इतर फोटो दाखविले असता त्यांनी घरातच मुलीला मारहाण करुन जावयाची माफी मागितली. आई, वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचे तरुणीने पतीला सांगितले. संतापलेल्या तरुणाने पत्नीसह तिच्या आई, वडील अशा सहा जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.