चाळीसगाव (प्रतिनिधी) आपल्या विविध समाजोपयोगी उप्रक्रमांसाठी नेहमी चर्चेत असणारे जिल्हा दुध संघाचे चेअरमन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील १२०० अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण समारंभ चाळीसगाव येथे दि.१२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याहस्ते या विद्यार्थ्यांना सायकल भेट दिली जाणार असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन असणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जळगाव अंकित जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार असणार आहेत. चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान, (सिग्नल पॉइंट) येथे दि.१२ रोजी सायंकाळी ४ वाजता भव्यदिव्य कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण होणार आहे.
विद्यार्थ्यांची अवघड शिक्षणवाट सोपी करण्याचा मानस : आमदार मंगेश चव्हाण !
३ ते ५ किमी पायी प्रवास करीत शाळा व महाविद्यालये गाठणा-या विद्यार्थ्यांची यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. पक्ष, जात – पात, गट – तट, धर्म – पंथ या सर्वच ‘राजकीय’ अटी – शर्ती पुसून टाकतांना निवड समितीने अत्यंत पारदर्शीपणे विद्यार्थ्यांची निवड केली आहे. इयत्ता ७ वी ते १० पर्यंतच्या अनाथ, दिव्यांग, ऊसतोड मजूर, कष्टकरी, कामगार, शेतमजूर पालकांच्या पाल्यांचा यात समावेश आहे. अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतांना त्यांच्या कुटूंबात परिस्थितीने निर्माण केलेले ताणेबाणे…शिक्षणासाठी त्यांचा असलेला संघर्ष अवस्थ करुन जातो तर त्यांची शिकण्याची अपार जिद्द नव्या उमेदीची वात पेटवून जाते. विद्यार्थ्यांची अवघड शिक्षणवाट सोपी करण्याचा हा सोहळा माझ्यासाठी नामदेवाच्या पायरीवर डोक ठेवून भाळी समाधानाचा बुका लावण्यासारखा प्रासादिक आहे.