नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचारासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. जालियनवाला बाग हत्याकांडासारखीच परिस्थिती आज उत्तरप्रदेशात निर्माण झाली आहे, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशातील शेतकरी काही मुद्यांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारविरोधात शांततेत आंदोलन करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचा एक गट आंदोलन करत आहे. हे आंदोलन शांततापूर्णपणे आंदोलन करण्यात येत आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीत येण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर यंत्रणेनं तो दडपण्याचा प्रयत्न केला, असं शरद पवार म्हणाले.
लोकशाहीत शांततेत आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याचं अधिकारानं लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही लोकांनी विशेषत, भाजप सरकारांमध्ये सत्तेत सहभागी असणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांनी शेतकऱ्यांवर गाडी चालवून दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही शेतकऱ्यांची हत्या झाली, आणखी काही लोकांची हत्या झाली आहे. काही गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार ६ ते ८ शेतकऱ्यांची जबाबदारी दिल्लीतील केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारची जबाबदारी आहे, असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांवर ज्या प्रकारे हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो. फक्त निषेध करुन चालणार नाही याची चौकशी झाली पाहिजे. वृत्तपत्रात वाचल्यानुसार उत्तर प्रदेश सरकारनं जबाबदारी घेणार असल्याचं वाचनात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला त्यातून केंद्र सरकारचा शेतकऱ्यांप्रती दृष्टिकोन समोर आला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचं नाही तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांकडून दिली जाईल.
काँग्रेसचे नेते आणि शेतकऱ्यांचे नेते त्यांना तिथं जाण्यापासून रोखलं जातं याचा मी निषेध करतो. शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, आम्ही देशभर विरोधी पक्षात काम करणारे लोक शेतकऱ्यांसोबत राहणार आहे. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी काम करता येईल ते काम करु, असा विश्वास शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला आहे. उत्तर प्रदेशातील सरकार संवेदनाहीन असल्याचं दिसतंय. शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तिथं दु: ख व्यक्त करायला जाणाऱ्यांना अडवलं जातं. इंग्रजांनी जालियानवाला बागेत जी स्थिती निर्माण केली होती. ती स्थिती उत्तर प्रदेशात दिसतेय, असा आरोप शरद पवारांनी केली आहे.
















