मुंबई (प्रतिनिधी) येत्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असल्याचे स्पष्ट होत आहे.
बुधवारी संध्याकाळी सहाव्यांदा दिल्ली दरबारी निघालेल्या शिंदेंचा दौरा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला, मात्र त्याआधीच त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची आणखी एक डेडलाईन सांगितली आहे. शिंदेंच्या म्हणण्यानुसार कॅलेंडरचं पान उलटण्यापूर्वीच राज्याला नवीन मंत्रिमंडळ मिळायला हवं. येत्या चार दिवसात जुलै महिना संपत आहे. त्यामुळे ३१ जुलैच्या आधी कॅबिनेट विस्ताराला मुहूर्त मिळण्याची चिन्हं आहेत. आज आणि उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ३० किंवा ३१ जुलैला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कॅबिनेट विस्तार एका टप्प्यात करायचा की दोन, याविषयी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम निर्णय घेतला नसल्याचे कळते. परंतू दिल्ली दौऱ्यात शिंदे मंत्रिमंडळचा विस्तार आणि खाती वाटप यावर शिक्कामोर्तब करुन येण्याची शक्यता आहे.