मुंबई (वृत्तसंस्था) आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा! ‘बांग्लादेश मुक्ती संग्रामाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नक्की कधी अटक झाली होती? त्यांना कोणत्या पोलीस ठाण्यात किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती स्वत: पंतप्रधानांनी द्यावी,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.
बांगलादेशच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश मुक्ती संग्रामाविषयी बोलताना आंदोलनातील स्वत:च्या सहभागाचाही उल्लेख केला होता. ‘बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. हे आंदोलन माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनांपैकी होतं. तेव्हा मी २०-२२ वर्षांचा असेन. पाकिस्तानी सैन्यानं बांगलादेशी नागरिकांवर केलेल्या अत्याचाराची छायाचित्रं पाहून अनेक दिवस आम्हाला झोपही लागली नव्हती. बांगलादेशच्या स्वातंत्र्याबद्दल जी भावना बांगलादेशात होती, तितकीच ती भारतात होती,’ असं मोदी यांनी काल आपल्या भाषणात नमूद केलं होतं. यावरून आता जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. ‘आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र, ‘आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले? त्यांना कोणते पोलीस ठाणे किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल,’ असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला आहे.
मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल. असे जयंत पाटील म्हणाले .