मुंबई (वृत्तसंस्था) रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे काहींनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल, अशा शब्दात मनसे नेते अमित ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेवर भाष्य केले आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, “रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल”
मुंबईतील सुमारे २ हजार किमीच्या रस्त्यावर केवळ ९२७ खड्डे आहेत असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे ४८ कोटींची तरतूद केली ती याच ९२७ खड्यांसाठी का? असा उपरोधिक सवाल करीत भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यात झोल असा टोला लगावला.
















