मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. ‘सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशानं पाहिलं आहे’, असे म्हणत मराठा आरक्षणावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
“राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी पुढाकार न घेतल्यामुळे मराठा तरूणांचा खेळखंडोबा करून ठेवला आहे,. मात्र आता त्यांनी मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते.
याव्यतिरिक्त मराठा आरक्षण ईडब्ल्यूएस अंतर्गत देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र, त्यांनी मराठा तरूणांचा विश्वासघात केलाय. या निटिफिकेशनमध्ये त्यांनी एसईबीसी प्रवर्गाचा साधा उल्लेखही केला नाही आणि इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला आहे.