मुंबई (वृत्तसंस्था) शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांना खडेबोल सुनावले.
शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३० जणांचे बळी घेतले. एकूण ११ ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसाच्या रेट्यामुळे चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये एका घटनेत दरड तर दुसऱ्या घटनेत संरक्षक भिंत घरांवर कोसळली. यानंतर विरोधकांनी मुंबई महापालिकेला लक्ष्य करत शिवसेनेवर टीका केली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून विरोधकांना खडेबोल सुनावले.
मुळात मुंबईच्या स्वतःच्या भौगोलिक मर्यादा आहेत. त्याच्या विपरीत लोकसंख्येचा भार या शहराला पेलावा लागत आहे. आधीच जागेची मर्यादा आणि त्यात अमर्याद मानवी लोंढे यामुळे मिळेल तेथे, जमेल तसे राहा हे समीकरण दृढ झाले. मानवी लोंढे न थांबल्याने मुंबईतील निवासाचे गणित अधिकच जटील झाले आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
डोंगरउतारांवरील शेकडो वसाहती आणि जुन्या धोकादायक इमारतींमध्ये ‘नोटिसा’ मिळूनही जीव मुठीत घेऊन राहणे, हे या गणिताचे सामान्य जनतेचे अपरिहार्य उत्तर आहे. मुंबई महापालिका आणि प्रशासन त्यांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न आपल्या परीने करीत असले तरी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे.
पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो. १७ जुलैच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे’, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.