नाशिक (वृत्तसंस्था) नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी कांदेंनी थेट न्यायालयातच धाव घेतली होती. दरम्यान, यासंदर्भात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मानसांनी फोन करून धमकावले, असा दावा शिवसेना आमदार कांदे यांनी केला आहे.
नांदगाव मतदारसंघाच्या विकासकामाच्या आढावा बैठकीत यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी निधीचा विनियोग नीट केलेला नाही. तसेच दहा कोटींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याची अद्याप सुनावणी झालेली नाही. त्यावरून सुरु झालेला वाद आज वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार आली आहे. त्यानुसार हा खटला मागे घ्यावा यासाठी छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे याने ९६६४६६६६७६ या क्रमांकावरून दुरध्वनी केला. हा खटला मागे घ्या, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असे धमकावले. असे नाशिक पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे.